असे करा धान्य साठवणुकीचे व्यवस्थापन
असे करा धान्य साठवणुकीचे व्यवस्थापन
शेतमालाची ची कापणी झाल्यानंतर बरेच शेतकरी शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून धान्य साठवून ठेवतात. पण अशास्त्रीय साठवणूक, कीटक, उंदीर, सूक्ष्मजीव इत्यादींमुळे शेतमालाचे मोठे नुकसान होते. साधारण हे नुकसान एकूण अन्नधान्यांपैकी सुमारे 10 टक्के आहे. साठवलेल्या धान्यावर अनेक कीटकांचा हल्ला होतो. यावरून काळजीपूर्वक साठवणुकीचे महत्त्व सहज लक्षात येते. अन्नधान्य आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार (२०१६), घरगुती स्तरावर केलेल्या साठवणूकीतील अन्नधान्यांचे सुमारे ४० ते ५० टक्क्यापर्यंत नुकसान होते. यामुळे अन्नधान्यांच्या उत्पादनासाठी घेतलेली मोठी मेहनत वाया जाते. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही समस्या अत्यंत मोठी आहे. त्यामध्ये साठवणूकीतील किडीचा मोठा वाटा आहे. साधारणपणे कीटक जवळच्या शेतातून, फार्म स्टोअर हाऊसमधून उडतात आणि साठवलेल्या धान्यांवर अंडी घालणे सुरू करतात . किडी अन्नधान्याची नासाडी करतात आणि त्याचास परिणाम बियाच्या अंकुरणक्षमतेवर सुद्धा होतो.
वातावरणातील आर्द्रता व तापमान यांचे महत्त्व :-
साठवणुकीत बियाण्याची उगवण क्षमता व जोम यावर प्रामुख्याने बियाण्यातील ओलाव्याचे किंवा वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण, तापमान, वायू व बियाण्याची भौतिक स्थिती याचा परिणाम होतो. यांपैकी वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यास त्यात साठवलेल्या बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाणही वाढते. सर्वसाधारणपणे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यास ते बियाण्याच्या अंकुरणक्षमतेला हानिकारक असते.
बुरशीमुळे होणारा उपद्रव:-
अतिसूक्ष्म जीवाणू व बुरशी याचा धान्य भांडारातील बियाण्यावर अनिष्ट परिणाम होतो. वेगवेगळ्या बुरशींच्या प्रकारांपैकी ॲस्परजीलस व पेनिसिलीयम या प्रकारच्या बुरशीच्या निरनिराळ्या जाती आहेत त्या मुख्यत धान्य भांडारात बियाण्यांना जास्त अपाय पोहोचवतात. या बुरशीमुळे बियाण्यांची उगवण शक्ती कमी होते आणि बियांच्या अथवा त्यांच्या अंकुराच्या रंगात बदल होतो, बियांत विषारी बुरशीजन्य द्रव्ये तयार होतात त्यांना कुबट वास येतो आणि त्या केकसारख्या एकमेकांना घट्ट चिकटून बसतात. या प्रकारच्या नुकसानीमुळे बिया कुजतात.
किडींचा प्रादुर्भाव:-
भांडारात किडींची संख्या जास्त झाली तर भांडारातील तापमान, आर्द्रता व कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण वाढते. किडींच्या प्रादुर्भावामुळे बियांची उगवण शक्ती अनेक मार्गांनी कमी होते. अळ्या अथवा किडी मुख्यतः बियांतील अंकुर खातात. किडीमुळे बियांमध्ये बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. कित्येक वेळा किडी बियांत कोष अथवा जाळ्या तयार करतात. त्यामुळे बियाणे स्वच्छ करताना अडथळा येतो व बरेचसे बियाणे वायाही जाते. त्याचप्रमाणे किडीच्या नायनाटासाठी वापरलेल्या औषधांचा बियाण्यांच्या उगवण शक्तीवर अनिष्ट परिणाम करतात.
साठवलेल्या धान्यातील प्रमुख कीडी:-
लेसर धान्य बोअरर (Rhizopertha dominica)
तांदळातील सोंड किडा (Sitophilus oryzae)
खापरा भुंगा (Trogoderma granarium)
रस्ट रेड फ्लोअर भुंगा (Tribolium castaneum )
लांब डोके असलेला पीठ भुंगा (Latheticus oryzae)
सॉ टूथ भुंगा (Oryzaephilus surinamensis)
तांदूळ पतंग (Corcyra cephalonica)
बदामाचा पतंग (Cadra cautella)
धान्य पतंग (Sitotroga cerealella)
पल्स भुंगा (Callosobruchus chinensis, C. maculates, C. analis)
कीटक नसलेल्या कीटकांमध्ये उंदीर, माइट्स आणि बुरशी यांचा समावेश होतो.
धान्य साठवणुकीचे व्यवस्थापन:-
1. बियाणे भरण्यासाठी वापरलेल्या गोण्या अथवा पोती ही कडक उन्हात वाळवून कीडनाशकांची प्रक्रिया करूनच वापरावे. बी भरण्यासाठी शक्यतो नव्या गोण्या वापरणेच योग्य ठरते.
2. पोती साठवणूक करताना जमिनीचा संपर्क येणार नाही अशा प्रकारे जमिनीपासून योग्य उंचीवर ठेवावी. बाजारामध्ये आता धान्य साठवणुकीत ठेवण्यासाठी कीड नियंत्रक सापळे उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा.
3. हवाबंद जागेमध्ये बियाणे साठवणूक केल्यास त्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. किडींच्या वाढीसाठी आवश्यक ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कीड लागत नाही.
4. कडूनिंब आधारीत कीटकनाशक (निमतेल, निम अर्क या पैकी कोणतेही एक) २ मि.ली. प्रती किलो बियाण्यास चोळावे किंवा पोत्यावर बाहेरून फवारावे.
धान्याला लागणारी कीड रोखण्यासाठी लसूण, लाल मिरच्या, लवंग, मिरे प्रभावी काम करते. हे पदार्थ धान्यांच्या थरांत ठेवाव्यात. त्यामुळे कीड आणि अळींचा प्रादुर्भाव कमी होतो.
5. साठवणुकीची पोती, पक्की कोठारं, वाहतुकीची साधने किंवा भिंतीच्या फटी मधील किडींचा नाश करून घ्यावा. त्यासाठी जमिनी, भिंती व पक्की कोठारे यांच्या बाह्य बाजूने मेलॉथियान १० मि.लि. प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी उघडया बियाण्यावर करू नये. त्यानंतर बियाणे साठवणूक करावी.
6. पावसाळ्यात साठवणगृहे ही हवाबंद करून धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर करता येतो. साठवलेल्या बियाणांवर प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्रीने झाकून त्यात धुरीजन्य कीटकनाशकांच्या पुड्या फोडून ठेवाव्यात. हे झाकण ८-१० दिवस बंद ठेवावे.
7. धातूच्या पत्र्याच्या कोठ्यां बियाणे साठवणुकीस उत्तम पर्याय आहे. साधारण 200 ग्रॅम मीठ एक किलो डाळीमध्ये मिसळून 6-8 महिन्यांच्या कालावधीसाठी साठवले जाऊ शकते.
8. वर्षभरासाठी धान्य साठवण्याकरिता ज्वारी, बाजरी, मका, भात, उडीद ही धान्ये सुपाने पाखडून, साफ करावे. अन्नधान्य मध्ये ओलावा जास्त असेल तर ते उन्हामध्ये वाळवून ओलाव्याचे प्रमाण आठ टक्के पेक्षा कमी करावे.
9. उंदरांच्या नियंत्रणासाठी विषारी आमिषाचा वापर करावा. याकरिता ३८० ग्रॅम गहू/ज्वारी/ मक्याचे पिट त्यात१० मिलि गोडेतेल आणि १० ग्रॅम झिंक फॉस्फाइड (८०%) पावडर घालून काडीने चांगले ढवळावे. व या विषारी आमिषाचे लहान प्रत्येकी १० ग्रॅमच्या गोळे तयार करून घ्यावे. प्रत्येक बिडात एक गोळा ठेवावा.
धान्य साठवणुकीच्या पद्धती
10. साठवण संरचनेच्या मूलभूत समजामध्ये हवा आणि आर्द्रतेचे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे जेणेकरून साठवण करताना कोणत्याही सजीवांना ऑक्सिजनची उपलब्धता होऊ नये. भारतात, मोट्या प्रमाणात अन्नधान्य पारंपरिक स्टोरेज सिस्टीममध्ये साठवले जाते, जे भात किंवा गव्हाचा पेंढा, बांबू, लाकूड, विटा, चिखल, शेण, इत्यादी वापरून तयार केले जाते. धान्य साठवणुक घराबाहेर किंवा आत करता येते. आधुनिक साठवणूक पद्धती मध्ये पुसा बिन (ICAR-IARI), घरगुती हापूर बिन (Indian grain storage institute), पीएयू बिन (पंजाब कृषी विद्यापीठ) इत्यादीसारख्या आधुनिक साठवण पद्धतीचा वापर कमी धान्य साठवणुकीसाठी (1 ते 3 टन) चांगल्या प्रकारे करता येतो.
डॉ. पूनम मडावी (सहायक प्राध्यापक, कीटकशात्र विभाग, डॉ. रा. गो. कृ. म., बुलढाणा)
डॉ. ए. के सदावर्ते (सहयोगी प्राध्यापक, कीटकशात्र विभाग, डॉ. पं. दे. कृ. वी., अकोला)
हे सुध्धा वाचा
रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान आणि कांद्यामधील रोग नियंत्रण कशे करावे
https://krushigyan.com/rabi-onion-cultivation-and-disease-control/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://krushigyan.com/whatsapp-group/