लिंबू लागवडीतून लाखोंचा नफा – संपूर्ण माहिती एका क्लिकवर

लिंबू लागवडीतून लाखोंचा नफा – संपूर्ण माहिती एका क्लिकवर
लिंबू हे आपल्या रोजच्या आहारात वापरले जाणारे एक आंबटसर चवीचे फळ आहे. कच्चे असताना ते हिरव्या रंगाचे असते आणि पिकल्यानंतर पिवळे होते. लिंबाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत – ईडलिंबू आणि कागदी लिंबू. कागदी लिंबूचा उपयोग सरबत, लोणच्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
महाराष्ट्र राज्यात विविध फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्यामध्ये लिंबूवर्गीय फळांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे. मोसंबी, संत्रा आणि कागदी लिंबू ही लिंबूवर्गीय फळांमध्ये महत्त्वाची आहेत. महाराष्ट्रातील हवामान या फळांसाठी अतिशय पोषक असल्याने कागदी लिंबाची लागवड झपाट्याने वाढत आहे.
सध्या महाराष्ट्रात ४०,००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र कागदी लिंबाच्या लागवडीखाली आहे. अहमदनगर, जळगाव, सोलापूर आणि अकोला हे कागदी लिंबू लागवडीसाठी प्रसिद्ध जिल्हे आहेत. त्यानंतर पुणे, यवतमाळ, नाशिक, सांगली, नागपूर, धुळे आणि बीड या जिल्ह्यां मध्येही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.
लिंबू लागवडीसाठी योग्य जमीन:
लिंबू लागवड प्रामुख्याने कोरड्या हवामानाच्या भागात करावी, कारण अशा ठिकाणी कमी पावसामुळे झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे लिंबू लागवड करताना हवामानाचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे.
कागदी लिंबू लागवडीसाठी मध्यम काळी किंवा हलकी मुरमाड जमीन योग्य मानली जाते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात चुनखडी किंवा क्षार नसावेत. लिंबू लागवडीसाठी जमिनीचा सामू (pH) ६.५ ते ७.५ दरम्यान असावा, तसेच क्षारांचे प्रमाण ०.१ टक्क्यापेक्षा कमी असणे चांगले राहते.
लिंबू हे बहुवर्षीय पीक असल्यामुळे सतत पाणीपुरवठा होण्याची सोय असलेल्या भागातच त्याची लागवड करावी, जेणेकरून झाडांना आवश्यकतेनुसार पाणी मिळू शकेल.
सुधारित लिंबू जाती:
1. साई शरबती
उत्पादन: 46.90 टन/हेक्टर/वर्ष
फळाचे वजन: 49.87 ग्रॅम
रसाचे प्रमाण: 54.51%
सालीची जाडी: 1.52 मि.मी.
वैशिष्ट्ये: अंडाकृती, एकसारखी आकाराची फळे, पातळ साल, कॅंकर व ट्रिस्टेझा रोगाला सहनशील.
2. फुले शरबती:
पहिला बहर: तिसऱ्या वर्षापासून
उत्पादन: 52.19 टन/हेक्टर/वर्ष (13व्या वर्षी)
फळांचा आकार: गोलसर, पातळ साल (1.95 मि.मी.)
रसाचे प्रमाण: 52.52%
झाडांची वाढ: 86.50 घनमीटर
वैशिष्ट्ये: रोग व किडींना अधिक सहनशील, जोमदार वाढ.
3. चक्रधर (सीडलेस लिंबू)
उत्पादन: 40-45 टन/हेक्टर/वर्ष
फळाचे वजन: 50-55 ग्रॅम
रसाचे प्रमाण: 55-60%
सालीची जाडी: 1.5-2.0 मि.मी.
वैशिष्ट्ये: बिया रहित (सीडलेस), गोलसर आणि मध्यम आकाराची फळे, गुळगुळीत आणि चमकदार साल, अधिक रसाळ व टिकाऊ, लिंबू कॅंकर आणि ट्रिस्टेझा रोगास सहनशील.
लिंबू लागवडीचे योग्य अंतर आणि तयारी
लिंबू लागवड ६ x ६ मीटर अंतरावर करावी. उन्हाळ्यात १ x १ x १ मीटर आकाराचे खड्डे खोदून उन्हात तापवावेत. पावसाळ्यापूर्वी खड्ड्यात दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारस केलेली ट्रायकोडर्मा मात्रा, ५-६ घमेली कुजलेले शेणखत, सेंद्रिय खत, निंबोळी पेंड आणि चांगल्या पोयटा मातीचा भरावा करावा. त्यानंतर जातिवंत रोपांची लागवड करून आवश्यक देखभाल करावी.
लिंबू रोपांची निवड आणि लागवड
लिंबांची लागवड मुख्यतः बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून करावी. बियांपासून उगवलेल्या रोपांमध्ये मातृवृक्षाचे सर्व गुणधर्म कायम राहतात आणि ती विषाणूमुक्त असतात. अशा रोपांपासून मिळणारी फळे पातळ सालीची आणि अधिक रसदार असतात. बीजांकुरण शास्त्रशुद्ध पद्धतीने होत असल्याने अशी झाडे दीर्घायुषी आणि उत्पादनक्षम ठरतात.
लिंबू बागेत आंतरपीक पद्धत
लिंबाच्या झाडांना फळे येण्यास साधारणतः चार ते पाच वर्षे लागतात. या काळात झाडांमधील मोकळ्या जागेत आंतरपिके घेता येतात. सुरुवातीला कांदा, लसूण, मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, गहू आणि मोहरी यासारखी आंतरपिके घेणे फायदेशीर ठरते. आंतरपिकामुळे बागेची सुपीकता टिकून राहते आणि अतिरिक्त उत्पन्न मिळते. मात्र, आंतरपिक घेताना मुख्य पिकाच्या वाढीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक खते शिफारशीनुसार स्वतंत्रपणे द्यावीत.
पूर्ण वाढलेल्या झाडांसाठी खत मात्रा (5 वर्षांवरील झाडे):
15 किलो शेणखत + 15 किलो निंबोळी पेंड
600 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद, 600 ग्रॅम पालाश
500 ग्रॅम व्हॅम + 100 ग्रॅम पी.एस.बी. + 100 ग्रॅम ऍझोस्पिरीलियम + 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा
खतांचे विभागणी वेळापत्रक:
40% नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश व जैविक खते – जूनमध्ये
उरलेले 60% नत्र – सप्टेंबर व जानेवारीत विभागून
सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी:
मार्च आणि जुलै महिन्यात 0.5% झिंक सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट.
0.3% फेरस आणि कॉपर सल्फेट एकत्र फवारणी.
लिंबू बहार व्यवस्थापन
बहार प्रकार:
लिंबू लागवडीनंतर ४-५ वर्षांनी फळधारणा सुरू होते.
प्रमुख बहार – मृग (जून), हस्त (ऑक्टोबर), आंबे (फेब्रुवारी).
अधिक नफा मिळवण्यासाठी हस्त बहार फायदेशीर (मार्च ते जूनमध्ये चांगला बाजारभाव).
हस्त बहारासाठी आवश्यक उपाययोजना:
उन्हाळ्यात पाण्याची योग्य व्यवस्था आवश्यक.
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे फळधारणा कमी होऊ शकते.
गुंडीगळ टाळण्यासाठी वेळेवर संजीवकांची फवारणी करावी.
संजीवक फवारणी वेळापत्रक:
जून: 10 PPM जिब्रेलिक अॅसिड (GA3) फवारणी.
सप्टेंबर: 1000 PPM सायकोसील किंवा लिहोसिन (CCC) फवारणी.
ऑक्टोबर: 1% पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी.
लिंबावरील कीड व रोग व्यवस्थापन
कीड नियंत्रण:
1. पाने पोखरणारी अळी:
नोहॅलूरॉन 5 मि.ली / इमिडाक्लोप्रीड 2.5 मि.ली / थायडीकार्ब 10 ग्रॅम (10 लि. पाणी)
2. पांढरी / काळी माशी:
अॅसिफेट 15 ग्रॅम / ट्रायझोफॉस 20 मि.ली (10 लि. पाणी)
3. कोळी कीड:
अबामेक्टीन 4 मि.ली / पोपरगाईट 10 मि.ली (10 लि. पाणी)
4. मावा व पिठ्या ढेकूण:
मावा: अबामेक्टीन 4 मि.ली / पोपरगाईट 10 मि.ली
5. पिठ्या ढेकूण: क्लोरपायरीफॉस 25 मि.ली / डायमिथोएट 15 मि.ली
व्हर्टिसिलिअम लेकॅनी 20-40 ग्रॅम (10 लि. पाणी)
रोग नियंत्रण:
1. कँकर / खैर्या:
स्ट्रेप्टोसायक्लीन 1 ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम (10 लि. पाणी) – 3-4 फवारण्या.
2. ट्रिस्टेझा:
मावा किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके फवारावीत.
3. मुळकुज व डिंक्या:
फोसेटाईल अल 30 ग्रॅम (10 लि. पाणी) फवारणी
मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब 20 ग्रॅम (मातीत ड्रेंचिंग)
4. शेंडेमर:
रोगग्रस्त फांद्या छाटणी
कार्बेन्डॅझीम 10 ग्रॅम / कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम (10 लि. पाणी)
5. प्रमुख विकृती (पाने पिवळी पडणे):
लोहयुक्त खतांची मात्रा वाढवावी.
6. पानगळ:
तांब्याची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी.
7. सामान्य उपाय:
एकात्मिक व्यवस्थापन पद्धती अवलंबावी.
मोरचूद 500 ग्रॅम + चुना 250 ग्रॅम + गेरू 250 ग्रॅम यांची पेस्ट 3-4 फूट उंची पर्यंत लावावी.
लिंबू उत्पादन
1. शास्त्रीय पद्धतीने निगा राखल्यास चौथ्या वर्षापासून फळधारणा सुरू होते.
2. एका झाडापासून सरासरी 50-100 ग्रॅम वजनाची 400-500 फळे मिळतात.
3. 5-7 वर्षांच्या निरोगी झाडापासून प्रतिवर्षी 2000-2500 फळे मिळू शकतात.
4. साई शरबती आणि फुले शरबती वाणांपासून अधिक उत्पादन मिळते.
हे सुध्धा वाचा……
ह्या पाच फवारण्या करतील आंबा मोहोराचे संरक्षण
https://krushigyan.com/spraying-on-mango-during-flowering-fruit-setting/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा