“कडुनिंब: शाश्वत शेतीसाठी एक अमूल्य देणगी”

“कडुनिंब: शाश्वत शेतीसाठी एक अमूल्य देणगी”
१ शुभम आनंदराव काकड, मो. नं. ९०४९७०११६५ आचार्य पदवी विद्यार्थी वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला
२ अक्षय सुनिल ढेंगळे, आचार्य पदवी विद्यार्थी कृषि विस्तार शिक्षण विभाग, डॉ .पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला
३ योगेश कृष्णा निरगुडे, आचार्य पदवी विद्यार्थी वनस्पती रोगशास्त्र शिक्षण विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला
परिचय:
कडुनिंब (अझाडायरेक्टा इंडिका ) ही भारतात पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात अत्यंत उपयुक्त व बहुआयामी वनस्पती म्हणून ओळखली जाते. कडुनिंब च्या झाडाचा प्रत्येक अंग जसे की खोड, खोडाची साल, पाने आणि बिया (निंबोळ्या) यामध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकीय गुणधर्म असतात.
आजच्या काळात पिकांवरील कीडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरण, मानवी आणि प्राणी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. रासायनिक कीटकनाशकांच्या अती वापरामुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासोबतच नैसर्गिक मित्र कीड सुद्धा नष्ट होते. याशिवाय, या कीटकनाशकांचे अवशेष पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्यामुळे भविष्यकाळात जीवन सृष्टीसमोर गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
या संकटांवर मात करण्यासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर हा प्रभावी पर्याय आहे. वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा उपयोग कृषी, बागायती व वन क्षेत्रातील महत्त्वाच्या कीटकांच्या नियंत्रणासाठी पारंपरिकपणे केला जातो. कडुनिंबाचे झाड हे संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून २१व्या शतकातील “कल्पवृक्ष” म्हणून ओळखल्या जाते
कडुनिंब ही निकृष्ट, उथळ व खारट जमिनीतही प्रभावीपणे वाढणारी वनस्पती आहे. औषधी व कीटकनाशकीय उपयोगा शिवाय, कडुनिंब सावली देण्यासाठी, वारा अडवण्यासाठी आणि ग्रामीण भागात सरपणासाठी देखील वापरले जाते. आधुनिक युगाला रासायनिक कीटकनाशके व खते यांचा प्रभावी पर्याय म्हणून कडुनिंब बघता येईल.
(कडूनिंबाची पाने आणि बिया)
कडुनिंब उत्पादने आर्थ्रोपॉड्सच्या ३५० पेक्षा अधिक प्रजाती, सूत्रकृमींच्या १२ प्रजाती, बुरशीच्या १५ प्रजाती, विषाणूंच्या ३ प्रजाती, गोगलगायांच्या २ प्रजाती आणि एक क्रस्टेशियन प्रजातीसाठी प्रभावी ठरलेली आहेत. त्यामुळे कडुनिंबाचे महत्त्व वाढत असून पर्यावरणपूरक शेतीसाठी एक आदर्श उपाय म्हणून त्याचा विचार करता येईल.
कडुनिंब (अझाडायरेक्टा इंडिका) हा भारतीय उपखंडातील मूळ वृक्ष असून त्याला ‘बॉटनिकल मार्वल’, ‘व्हिलेज फार्मसी’, ‘वंडर ट्री’, ‘ऑल-कॅन-ट्रीट-ट्री’ आणि ‘निसर्गाची भेट’ या नावांनी गौरवले जाते. कीड व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि औषधनिर्मिती या क्षेत्रांमध्ये कडुनिंबाची मोठी व्यापकता आहे.
अझाडायरेक्टीन ची शोधयात्रा:
सन १८८८ साली रसायनशास्त्राचा अभ्यास करणारे वॉर्डन हे सल्फरयुक्त कडुनिंब तेलाचा अभ्यास करणारे पहिले वैज्ञानिक होते. १९४० नंतर झालेल्या रासायनिक तपासणीत कडुनिंबाच्या झाडामध्ये निंबीन नावाचे प्रमुख कडू तत्त्व स्फटिक स्वरूपात वेगळे केले गेले. नंतर, “कडुनिंबाच्या सालापासून निंबिनिन, फुलांपासून निंबोस्टेरॉल, पानांपासून निंबोसिनोन, तेलातून निंबिडिन आणि निंबिनिन तसेच डिंकातून अल्डोबायरॉनिक ऍसिड यांसारखी संयुगे शोधण्यात आली”.
१९६८ मध्ये, कडुनिंबातून अझाडायरेक्टीन नावाचा सर्वात शक्तिशाली टोळ प्रतिरोधक घटक वेगळा करण्यात आला. अझाडायरेक्टीन मध्ये कीटकनाशक, नेमॅटिकाइडल, बुरशीनाशक आणि जिवाणूनाशक गुणधर्म आहेत. हे विविध पीक वनस्पतींवर प्रभावीपणे कार्य करते, ज्यामुळे त्याची परिणामकारकता वाढते
कडुनिंबामध्ये आढळणारे रासायनिक घटक:
कडुनिंब हा एक बहुमुखी वृक्ष असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक आणि जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे आढळतात. कडुनिंबामधील रासायनिक घटक हे माश्या, झुरळे, बग, उवा, टिक्स, पिसू आणि माइट्स यांसारख्या वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाच्या आर्थ्रोपॉड्सविरुद्ध प्रभावी आहेत.
कडुलिंबाचे कीटक नियंत्रणातील वैज्ञानिक दृष्टिकोन
1) अन्न प्रतिबंधक म्हणून कार्य करते.
अँटीफीडंट (अन्न प्रतिबंधक) म्हणजे असे रसायन, जे कीटकांच्या अन्न प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करते; मात्र अँटीफीडंट (अन्न प्रतिबंधक) थेट कीटकांना मारत नाही. यामुळे कीटक उपासमारीने मृत्युमुखी पडतात. कडुनिंबाच्या कच्च्या अर्कात अन्न प्रतिबंधक गुणधर्म आढळतात, जे कीटक, पाने फुले आणि रस शोषण करतात याच्या विरुद्ध अत्यंत प्रभावी ठरतात.
2) अंडी घालण्यास प्रतिबंधक म्हणून कार्य करते.
कडुलिंबाचे तेल किंवा अर्क हे कीटकांच्या अंडी घालण्याच्या आणि उबवण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते. अंडी घालण्यास प्रतिबंध करणारी क्षमता (अंडी घालण्यास प्रतिबंधक) मुख्यतः या उत्पादनांच्या तीव्र गंधामुळे आणि अंड्यातील भ्रूण विकासामध्ये व्यत्यय आल्यामुळे ओव्हिसिडल क्रियाकलाप (अंड्यांच्या नाशाची क्रिया) घडू शकते. लेपिडोप्टेरस कीटकांमध्ये अंडी घालण्याविरुद्ध कडुनिंबाची प्रतिकारकता स्पष्टपणे दिसून येते.
कडुलिंबातील घटक कीटक वाढ नियामक (IGR) म्हणून कार्य करतात. कडुलिंबाच्या संपर्कात येणाऱ्या कीटकांच्या अवस्थेनुसार, त्यांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते.
3) जीवनकालावधी कमी होणे:
निंबोळी अर्काच्या संपर्कात आलेल्या कीटकांच्या विविध अवस्थांवर घातक परिणाम होतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनकालावधीत कमी होतो.
4) अविकसित प्रौढ तयार होणे:
कोषावस्थेतून बाहेर पडलेल्या प्रौढ कीटकांमध्ये विकृती, अपंगत्व, अविकसित पंख यांसारखे दोष आढळतात. याशिवाय, प्रजोत्पादन क्षमताही मंदावते, ज्यामुळे पिकांचे संभाव्य नुकसान कमी होऊ शकते.
पिक संरक्षणासाठी प्रभावी उपाय:
- कडुनिंबाचे ३% तेल तांदूळ या पिकावर दाणे भरणीच्या अवस्थेत येणाऱ्या किडीपासून संरक्षण देते.
- डाळी, तेलबिया, भुईमूग, निमगार्ड हे शेंगदाण्यांवरील नाग अळीचे नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.
- तिळा या पिकावरील बिहार केसाळ सुरवंटाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी NSKE ५% हा उपाय अत्यंत प्रभावी ठरला आहे.
- कापूस: NSKE आणि निंबीसिडिन ही कापसाच्या बोंडांना होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
- कडुनिंबाच्या अर्काचा वापर तांदूळाच्या पतंगांवर ओव्हिसिडल क्रिया दर्शवतो.
- धान्य साठवनुकि दरम्यान कीटकांवर कडुलिंबाचे तेल वापरल्यास त्यांचे अंडी घालण्याचे प्रमाण कमी होते.
- कृत्रिम उंदीरनाशकांऐवजी कडुनिंबाच्या बियांचा अर्क बायोरोडेंटिसाइड (उंदीर नाशक) म्हणून प्रभावी ठरतो.
फायदे:
- कडुनिंबापासून तयार केलेली कीटकनाशके पर्यावरणपूरक असून ती मातीवर कोणताही विषारी परिणाम करत नाहीत.
- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कडुनिंबापासून तयार केलेली कीटकनाशके उपयुक्त ठरतात.
- कडुनिंब कीटकांना थेट मारत नाही, मात्र, त्यांची जीवन प्रक्रिया बदलवते.
- कडुनिंबापासून तयार केलेली कीटकनाशके प्रामुख्याने रस शोषण करनाऱ्या कीटकांना लक्ष्य करतात.
- ही कीटकनाशके मित्र कीटकांना कोणतीही हानी पोहोचवत नाहीत.
- सस्तन प्राणी, पक्षी आणि इतर वन्यजीवांसाठी विषारी नाहीत. तसेच, मधमाश्या, कोळी आणि फुलपाखरे यांसारख्या लक्ष्य नसलेल्या कीटकांवर याचा परिणाम होत नाही.
- अधिक परिणामकारकतेसाठी कडुनिंबापासून तयार केलेली कीटकनाशके तेलाच्या संयोजनाने वापरली जाऊ शकतात.
- कीटक सामान्यतः कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांना प्रतिकार करत नाहीत.
- ही कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी रासायनिक किटकणाशकांच्या तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे प्रभावी साधन आहे.
- एकात्मिक कीड व्यवस्थापना मध्ये हे एक (IPM) प्रभावी कीटकनाशक आहे.
कडुनिंबाच्या निंबोळी अर्काचा नियमित वापर केल्याने पिकांवरील हानिकारक कीटकांचा प्रभाव कमी होतो, मित्र कीटकांचे संरक्षण होते आणि जमिनीची गुणवत्ता देखील सुधारते. शिवाय, हे उपाय स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्याने शेतीच्या खर्चातही बचत होते. शेती च्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आजपासूनच शेतकरी बांधवांनी रासायनिक कीटकनाशकांना एक प्रभावी पर्याय म्हणून निंबोळी अर्काचा वापर करावा.
हे सुध्धा वाचा…
“कमी खर्चात जास्त उत्पादन : कारले लागवडीचे रहस्य!”
https://krushigyan.com/the-secret-of-bitter-gourd-cultivation/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा