मायकोरायझा म्हणजे काय? पिकांसाठी निसर्गाने दिलेला ‘सुपरफ्रेंड’
मायकोरायझा म्हणजे काय? पिकांसाठी निसर्गाने दिलेला ‘सुपरफ्रेंड’
आज शेतीमध्ये वाढता खर्च, रासायनिक खतांवर वाढलेले अवलंबन आणि जमिनीची घटती सुपीकता ही मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत निसर्गाशी सुसंगत, खर्च कमी करणारे आणि उत्पादन वाढवणारे उपाय स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे. अशाच एका अदृश्य पण अत्यंत प्रभावी जैविक घटकाचे नाव आहे – मायकोरायझा (Mycorrhiza). ही बुरशी पिकांच्या मुळांशी सहजीवन निर्माण करून पिकांना नैसर्गिकरित्या बळकट बनवते.
मायकोरायझा म्हणजे काय?
|Myco = बुरशी | Rhiza = मूळ| मायकोरायझा ही एक जैविक, उपयुक्त बुरशी असून ती वनस्पतींच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते. ही बुरशी आणि वनस्पती यांच्यातील संबंधाला सहजीवी संबंध (Symbiotic Relationship) म्हणतात. या नात्यात दोघांनाही फायदा होतो.
मायकोरायझाचे प्रकार
1. एन्डो मायकोरायझा (Endo Mycorrhiza)
ही बुरशी मुळांच्या आत शिरून स्फुरद, झिंक व पाणी मुळांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे मुळे मजबूत होतात, झाडाची वाढ चांगली होते व उत्पादन वाढते. मिरची, टोमॅटो, हरभरा, सोयाबीन, कापूस, ऊस यांसारख्या सर्व शेती पिकांसाठी ही सर्वात उपयुक्त मायकोरायझा आहे.
2. एक्टो मायकोरायझा (Ecto Mycorrhiza)
ही बुरशी मुळांच्या बाहेर आवरण तयार करून पाणी व पोषण शोषण्यास मदत करते. प्रामुख्याने साग, निलगिरी, पाइन यांसारख्या जंगलातील झाडांसाठी उपयोगी असून सामान्य शेती पिकांत कमी वापरात आहे.
मायकोरायझा आणि वनस्पती यांच्यातील सहजीवन कसे कार्य करते?
मायकोरायझा बुरशी जमिनीत आपले सूक्ष्म तंतू पसरवून पाणी, स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्ये मुळांपर्यंत पोहोचवते. वनस्पती प्रकाशसंश्लेषण करून तयार केलेली शर्करा (अन्न) मायकोरायझाला देते. याचा दोघांनाही फायदा होतो, त्यामुळे मुळे मजबूत होतात, झाडाची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते हाच आहे सहजीवनाचा खरा अर्थ.
मायकोरायझाचे पिकांसाठी महत्त्वाचे फायदे
1. मुळांचा विकास सुधारतो
मुळांची लांबी व संख्या वाढते, रोपे लवकर स्थिरावतात व झाड मजबूत वाढते.
2. पोषणद्रव्यांचे शोषण वाढते
स्फुरद व सूक्ष्मद्रव्ये सहज मिळतात, त्यामुळे खतांचा उपयोग अधिक प्रभावी होतो.
3. फुलधारणा व फळधारणा वाढते
क्लोरोफिल वाढून फुलगळ कमी होते व उत्पादन वाढते.
4. पाणी व्यवस्थापन सुधारते
कमी पाण्यातही झाड तग धरते व दुष्काळाचा परिणाम कमी होतो.
5. रोगप्रतिकारशक्ती वाढते
मर रोग, मुळकूज व सूत्रकृमींपासून नैसर्गिक संरक्षण मिळते.
6. प्रतिकूल हवामान सहनशीलता वाढते
झाड काटक बनते व उष्णता-थंडीचा ताण सहन करते.
मायकोरायझाचा योग्य वापर कसा करावा?
1. बीज प्रक्रिया
पेरणीपूर्वी बियाण्यांना मायकोरायझा पावडर लावावी
उगवण आणि सुरुवातीची वाढ चांगली होते
2. रोपांची मुळे बुडवणे (Root Dipping)
लागवडीपूर्वी रोपे मायकोरायझाच्या द्रावणात बुडवावीत
रोपे लवकर स्थिरावतात
3. मातीमध्ये वापर (Soil Application)
शेणखत / कंपोस्ट खतामध्ये मिसळून
पेरणीवेळी किंवा उभ्या पिकात द्यावे
टीप: रासायनिक बुरशीनाशकांचा अतिवापर टाळावा, कारण त्यामुळे मायकोरायझावर परिणाम होऊ शकतो.
हे सुध्धा वाचा…
ट्रायकोडर्मा – नैसर्गिक बुरशीनाशक व जमिनीचा संरक्षक
https://krushigyan.com/trichoderma-natural-fungicide-and-soil-protector/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
