सोयाबीन वरील पिवळा मोझायक व्हायरस रोगावरील नियंत्रण
सोयाबीन वरील पिवळा मोझायक व्हायरस रो
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सौरव विलास गायकवाड आपण आज पिवळा मोझायक व्हायरस या सोयाबीन वरील अतिशय नुकसानकारक रोगावर कशाप्रकारे नियंत्रण आणायचे हे थोडक्यात बघणार आहोत. गेल्या ३/४ वर्षांपासून सोयाबीन वर पिवळा मोझायक या विषाणूजन् मोठ्या प्रमाणावर उद्रेक येत आहे, त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. याही वर्षी सगळीकडे आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे शक्यतो जास्त प्रादुर्भाव पूर्व विदर्भात आढळत आहे.
सोयाबीन वरील पिवळा मोझायक व्हायरस हा रोग विषाणूमुळे होतो या रोगामुळे पिकाच्या उत्पादनात १५ ते ७५ टक्के घट येऊ शकते.
रोगाची लक्षणे
सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरा जवळ पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात.
पाने जशी परिपक्व होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.
जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात.
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाडे पिवळे पडतात अशा झाडांना फुले व शेंगा कमी लागतात व उत्पादनात घट येते दाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण कमी होते.
विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशी या रस शोषक किडी द्वारे होतो.
व्यवस्थापन
पिवळा मोझायकचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडे व पाने वेळोवेळी नष्ट करावी व ती काढून योग्य ती विल्हेवाट लावावी जेणेकरून निरोगी झाडांवर त्याचा प्रसार होणार नाही.
वेळोवेळी पिकांचे कीड व रोग निरीक्षण व सर्वेक्षण करावे.
पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशी युक्त कीटकनाशकाची ६० ते ७० मिली प्रती १५ लिटर पंपा साठी आणि २०० लिटर पाण्यात १ लिटर एका एकरासाठी या प्रमाणात फवारणी करावी.
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक डायमेथोएट ३०% १०मिली किंवा मिथाइल डिमॅटन २५% १०मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
निंबोळी अर्क १०००० पी पी एम द्रावण ५०० मिली लिटर द्रावण दहा लिटर पाण्यात मिसळून हे फवारावे.
शेतामध्ये प्रति एकर १० पिवळे चिकट सापळे लावावे त्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रसार थांबतो.
थायामेथोक्सम 12.6% + लॅम्बडा-सायलोथ्रिन 9.6% २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
कीटकनाशकाची फवारणी करताना त्यामध्ये कुठलेही तणनाशक बुरशीनाशक, खत अथवा इतर रसायने मिसळून नये मिसळून फवारणी केल्यास किटकनाशकाचा अपेक्षित परिणाम न होता उलट पिकावर दुष्परिणाम होऊन पीक खराब होऊ शकते.
कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी दयावे बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवन क्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. अशाप्रकारे योग्य नियोजन केल्यास पिवळा मोझाक व्हायरसचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा