लसूण लागवड : उत्पादन वाढवणारी सोपी आणि फायदेशीर पद्धत
लसूण लागवड : उत्पादन वाढवणारी सोपी आणि फायदेशीर पद्धत
लसूण हे भारतातील सर्वाधिक मागणी असलेले आणि कंदवर्गीय पिकांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले पीक आहे. दैनंदिन आहारात, औषधांमध्ये, मसाले तयार करण्यासाठी आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये लसणाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शिवाय, लसणातील औषधी गुणधर्म श्वसन विकार, पचन समस्या, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसाठी उपयुक्त ठरतात. लसणाच्या योग्य लागवड तंत्रामुळे शेतकरी जास्त उत्पादन आणि चांगला नफा मिळवू शकतात.
हवामान आणि जमिनीची निवड
लसूण पीक थंड हवामानात चांगले विकसित होते. लागवडीनंतर 45-50 दिवस दमट व थंड हवामान, तर काढणीसाठी कोरडे हवामान फायदेशीर ठरते. लसणाचा कंद जमिनीत पोसत असल्याने भुसभुशीत, सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा. चांगल्या उत्पादनासाठी शेणखत किंवा सेंद्रिय खताचा वापर करावा.
उत्तम बेण्यांची निवड
लागवडीसाठी मागील हंगामात साठवलेले, विश्रांती मिळालेले व मोठ्या आकाराचे बेणे निवडणे खूप महत्त्वाचे आहे. लहान गड्डे किंवा खराब पाकळ्यांमुळे उत्पादनात घट येऊ शकते. लागवडीपूर्वी गड्ड्यांची कार्बेन्डाझिम (2 ग्रॅम प्रति लिटर पाणी) या द्रावणाने प्रक्रिया करावी.
लागवड तंत्र
लसणाची लागवड रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करावी. वाफे तयार करताना 15 सें.मी. अंतरावर रेषा आखून, प्रत्येक 10 सें.मी. अंतरावर लसूण पाकळ्या उभ्या लावून झाकाव्यात.
खत व्यवस्थापन
माती परीक्षण करून संतुलित खतांचा वापर करावा. प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, आणि 50 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा लागवडीपूर्वी व उर्वरित तीन हप्त्यांमध्ये विभागून द्यावी. गंधकयुक्त खताचा वापर केल्यास उत्पादन अधिक चांगले मिळते.
पाणी व्यवस्थापन
पहिले पाणी लागवडीनंतर लगेच द्यावे. सुरुवातीला 3-4 दिवसांनी आणि नंतर 8-10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाला जास्त पाणी साचण्यापासून वाचवावे, अन्यथा कंद खराब होऊ शकतो.
आंतरपीक व आंतरमशागत
लसूण पिकाबरोबर कोबी, कोथिंबीर किंवा मुळा यांची लागवड केल्यास अधिक नफा मिळू शकतो. तणनियंत्रणासाठी सुरुवातीच्या 45 दिवसांत खुरपणी करावी, मात्र कंद तयार होताना खुरपणी टाळावी.
कीड आणि रोग व्यवस्थापन
फुलकिडे (थ्रिप्स)
फुलकिड्यांमुळे पानांवर डाग पडतात आणि उत्पादनात घट होते. यावर नियंत्रणासाठी फिप्रोनिल (30 मि.लि./15 लिटर पाणी) किंवा प्रोफेनोफॉस (20 मि.लि./10 लिटर पाणी) याची फवारणी करवी.
जांभळा करपा
पानांवर पिवळसर जांभळे डाग पडून पाने करपतात. यासाठी मॅन्कोझेब (30 ग्रॅम/10 लिटर पाणी) किंवा क्लोरोथॅलोनिल (20 ग्रॅम/10 लिटर पाणी) यांची फवारणी फायदेशीर ठरते.
काढणी आणि साठवणूक
लसणाचे पीक 120-150 दिवसांत तयार होते. गड्डे उपटून सुकवून 20-30 गड्ड्यांच्या जुड्या बांधून हवेशीर ठिकाणी साठवाव्यात. अशा प्रकारे साठवलेला लसूण दीर्घकाळ टिकतो आणि बाजारात चांगला दर मिळतो.
उत्पादन
लसूण लागवड योग्य पद्धतीने केल्यास हेक्टरी 10-12 टन उत्पादन मिळू शकते.
लसूण लागवड ही शेतकऱ्यांसाठी सोपी, फायदेशीर आणि मागणी असलेली शेती पद्धती आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास लसूण शेतीमधून मोठा नफा मिळवता येतो. शेतकऱ्यांनी हे पिक निवडून आपले उत्पन्न वाढवावे आणि आर्थिक प्रगती साधावी.
हे सुध्धा वाचा
चीया लागवड: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! (लाखोंचा नफा कमवण्याची उत्तम शेती)
https://krushigyan.com/chia-cuiltivation-is-the-golden-opportunity-to-farmers/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा