ट्रायकोडर्मा – नैसर्गिक बुरशीनाशक व जमिनीचा संरक्षक

ट्रायकोडर्मा – नैसर्गिक बुरशीनाशक व जमिनीचा संरक्षक

ट्रायकोडर्मा – नैसर्गिक बुरशीनाशक व जमिनीचा संरक्षक

आपली शेती पिकवताना जमिनीला सेंद्रिय ठेवणे, बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करणे आणि रसायनांवरील खर्च कमी करणे हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांचे वारंवार वापर केल्यामुळे जमिनीतील जिवंतपणा कमी होतो. अशा वेळी ट्रायकोडर्मा ही नैसर्गिक बुरशी आपल्या जमिनीचे आरोग्य राखणारी, जमिनीतील वाईट बुरशीचा नाश करणारी व वाढ वाढवणारी म्हणून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते.

इतिहास

ट्रायकोडर्मा या बुरशीचा शोध सुमारे दोनशे वर्षांपूर्वी पर्सून  या वनस्पतीशास्त्रज्ञाने लावला. त्यानंतर वाईंडलिंग या शास्त्रज्ञाने ट्रायकोडर्माच्या बुरशीनाशक गुणधर्मांचा सखोल अभ्यास केला आणि नंतर भारतात विविध कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी ट्रायकोडर्मावर मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून शेतकऱ्यांच्या शेतीत आणले. आजच्या काळात ट्रायकोडर्मा हा बुरशीनाशक, ग्रोथ प्रवर्तक व सेंद्रिय खत विघटनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

ट्रायकोडर्मा कशी काम करते

ट्रायकोडर्मा जमिनीतील रोगकारक बुरशीवर तीन पद्धतीने आळा घालते.
पहिली पद्धत म्हणजे ही बुरशी दुसऱ्या बुरशीवर वाढते आणि तिचे पेशी भेदते, ह्याला मायकोपॅरासायटिझम  म्हणतात.
दुसरी पद्धत म्हणजे ही बुरशी विषारी घटक तयार करते, ज्यामुळे रोगकारक बुरशी नष्ट होते.
तिसरी पद्धत म्हणजे जमिनीतील अन्नद्रव्यांसाठी ट्रायकोडर्मा वाईट बुरशीशी स्पर्धा करते आणि तिला वाढू देत नाही.

ट्रायकोडर्मा कोणत्या बुरशींवर प्रभाव टाकते

ट्रायकोडर्मा जमिनीतील रायझोक्टोनिया, फ्युजेरियम, पिथियम, स्क्लेरोटियम, फायटोफ्थोरा या घातक बुरशींवर प्रभावीपणे आळा घालते. या बुरशीमुळे खोडकुज, मुळकुज, डॅम्पिंग ऑफ, सड, मुळांच्या रोगांसारखे गंभीर रोग होतात. ट्रायकोडर्मा यावर ८० टक्क्यांहून अधिक नियंत्रण ठेवू शकते. शास्त्रज्ञांच्या प्रयोगात ट्रायकोडर्माच्या योग्य वापराने जमिनीतील बुरशीजन्य रोग ७० ते ९० टक्क्यांपर्यंत आटोक्यात येतात.

ट्रायकोडर्मा कोणत्या रसायनांनी नष्ट होते

खरंतर ट्रायकोडर्मा एक सजीव बुरशी आहे. त्यामुळे जर शेतकरी क्लोरोपायरीफॉस, डायमेथोएट, कॅप्टन, कार्बेन्डाझीम, मॅन्कोझेब यांसारखी रसायने किंवा बुरशीनाशक वापरले तर ट्रायकोडर्मा जमिनीत ८० ते १०० टक्के नष्ट होऊ शकते. हे रसायन ट्रायकोडर्माच्या जिवंत पेशींना मारून टाकते. त्यामुळे ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर अशी रसायने ताबडतोब वापरू नयेत. किमान ८ ते १० दिवस अंतर ठेवावे. हे खूप महत्वाचे आहे.

ट्रायकोडर्मा ग्रोथ प्रवर्तक व डी-कंपोझर म्हणून

फक्त रोगावर नियंत्रण एवढ्यापुरतेच ट्रायकोडर्माचे महत्त्व नाही. ही बुरशी झाडांच्या मुळांभोवती राहून मुळांची वाढ वाढवते, पिकांना पोषक घटक सहज मिळवून देते आणि झाडांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. त्यामुळे ट्रायकोडर्मा नैसर्गिक वाढ प्रवर्तक म्हणून शेतकऱ्यांनी नक्कीच वापरावे.

ट्रायकोडर्मा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटनही प्रभावीपणे करते. पिकांचे अवशेष, पालापाचोळा, शेणखत हे सर्व विघटित करून ट्रायकोडर्मा जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवते. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जलधारण क्षमताही टिकून राहते.

ट्रायकोडर्माच्या जाती – सखोल विश्लेषण

ट्रायकोडर्मा ही बुरशी जवळपास ८० ते ९० वेगवेगळ्या जातींमध्ये आज ओळखली गेली आहे. परंतु शेतीसाठी मुख्यत्वे फक्त दोन जाती अधिकृतपणे शिफारसीत आहेत — ट्रायकोडर्मा व्हिरीडे आणि ट्रायकोडर्मा हार्झियानम. या दोन जाती शेतात वापरण्याचे कारण म्हणजे या जातींनी शास्त्रीय प्रयोगांमध्ये जमिनीतील रोगकारक बुरशींवर उत्कृष्ट नियंत्रण दाखवले आहे आणि जमिनीच्या पोषण व सेंद्रिय प्रक्रियेत उत्तम परिणाम दिला आहे.

ट्रायकोडर्मा व्हिरीडे

ट्रायकोडर्मा व्हिरीडे ही जात साधारणपणे बियाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी आणि रोपे लावण्यापूर्वी मुळांवर लावण्यासाठी जास्त योग्य मानली जाते. कारण ही जात बीजांकुरांभोवती सुरक्षा कवच तयार करून मुळांची सड व रोपांची डॅम्पिंग ऑफसारख्या बुरशीजन्य रोगांपासून उत्तम प्रकारे संरक्षण करते. जमिनीच्या वरच्या थरात राहून त्वरित वाढते आणि रोगकारक बुरशींना जागा देत नाही.

ट्रायकोडर्मा हार्झियानम

ट्रायकोडर्मा हार्झियानम या जातीचा वापर जमिनीच्या खोल थरात हळूहळू परंतु दीर्घकाळ प्रभाव राहील अशा ठिकाणी केला जातो. ही जात विशेषतः ड्रिपद्वारे किंवा जमिनीवर थेट सेंद्रिय खताबरोबर मिसळून सोडली जाते. हार्झियानम खोल मुळांभोवती राहून रोगकारक बुरशीवर दीर्घकाळ परिणाम करते, जमिनीतील सूक्ष्मजीवांची गुणकारकता वाढवते आणि डी-कंपोझर म्हणून सुद्धा चांगले काम करते.

दोन्ही जातींमध्ये फरक

  • व्हिरीडे – वरच्या थरात जलद प्रभाव, बीज प्रक्रिया व रोपांसाठी उत्तम.

  • हार्झियानम – जमिनीच्या आत खोलवर कार्यशील, ड्रिपद्वारे व थेट जमिनीवर वापरण्यास योग्य, दीर्घकाळ टिकणारे.

स्प्रेयिंगसाठी कोणती जात वापरावी?

जर पिकांवर रोगाचा धोका असेल आणि जमिनीतून बुरशीचे संक्रमण रोखायचे असेल, तर स्प्रेयिंगसाठी प्रामुख्याने ट्रायकोडर्मा व्हिरीडे वापरावी. कारण ही वरच्या थरात आणि पानांवर त्वरित परिणाम दाखवते.

ड्रीप किंवा जमिनीमध्ये वापरासाठी कोणती जात?

जर ड्रिपद्वारे किंवा थेट जमिनीत मिसळून द्यायचे असेल, तर ट्रायकोडर्मा हार्झियानम ही जात उत्तम मानली जाते. कारण ही खोलवर मुळांजवळ टिकते आणि दीर्घकाळ जमिनीला जिवंत ठेवते.

आज ट्रायकोडर्मा व्हिरीडे आणि हार्झियानम या दोन जाती आपल्या शेतीला रोगमुक्त, सेंद्रिय आणि पोषक ठेवण्याचे काम अतिशय योग्यपणे करतात. योग्य जाती योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापरली, तर रसायनांचा वापर कमी होऊन शेतीत नैसर्गिक सक्षमता वाढते. म्हणूनच शेतकरी बांधवांनी आपल्या पिकानुसार आणि जमिनीच्या अवस्थेनुसार ट्रायकोडर्माची योग्य जात निवडावी आणि शाश्वत शेतीकडे पाऊल टाकावे.

हे सुध्धा वाचा…

कामगंध सापळा: आधुनिक कीड व्यवस्थापनातील शाश्वत जैविक उपाय

https://krushigyan.com/pheromone-trap-eco-friendly-pest-control/

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/share/1FMhJ5TcHF/

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *